ठाणे-कल्याण जलद मार्गावर रविवार मेगा ब्लॉक : बदलापूरमध्ये रात्रीचे ब्लॉक ३ डिसेंबरपर्यंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. या काळात सर्व अप-डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेकडे वळवण्यात येणार असून काही फेऱ्या रद्द करण्याचीही गरज भासणार आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेलदरम्यान ब्लॉक नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. बेलापूर–पनवेलदरम्यान मात्र कामामुळे वाहतूक प्रभावित राहणार आहे.
दरम्यान, बदलापूर स्टेशन परिसरात पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू असल्याने २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान दररोज मध्यरात्री २ ते ३.३० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
३५० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे गर्डर उभारणी -
बदलापूर स्थानकात पादचारी पुलासाठी ३७.२ मीटर लांबीचे १८ स्टील गर्डर बसवण्याचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. हे गर्डर बसवण्यासाठी तब्बल ३५० मेट्रिक टन क्षमतेची महाकाय क्रेन तैनात करण्यात आली आहे. या उभारणीदरम्यान रेल्वे वाहतूक सुरक्षिततेसाठी सलग ११ दिवस रात्रीचे ब्लॉक लागू राहतील.
कर्जतकडे जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना -
ब्लॉकदरम्यान १२.१२ ची कर्जत–सीएसएमटी लोकल केवळ अंबरनाथपर्यंत धावेल. तसेच कर्जतहून २.३० वाजता सुटणारी लोकल अंबरनाथहून ३.१० वाजता सीएसएमटीकडे रवाना होईल. दोन्ही दिशांना अंबरनाथ–कर्जतदरम्यान लोकल रद्द राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते कर्जतदरम्यानची शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता असेल, अशी माहिती विभागाने दिली आहे.
विशेष रात्रकालीन ब्लॉक : २ डिसेंबरपर्यंत अडथळे हटविण्याचे काम -
पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामात येणाऱ्या यांत्रिक अडथळ्यांमुळे मध्य रेल्वेने २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे.
हे ब्लॉक दररोज पहाटे १.३० ते ३.३० या वेळेत राहतील. या कालावधीत पनवेल–कळंबोलीदरम्यान प्लॅटफॉर्म अप-डाऊन मार्गिका, इंजिन वळवण्याचे मार्ग तसेच कोचिंग यार्डमधील कामे संपूर्णपणे बंद राहतील. या कामांमुळे २० मेल–एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
News - Rajy




Petrol Price




