मांजरी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : पुण्यातील मांजरी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री आठ वाजेच्या सुमारास पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेले तीनही तरुण हडपसर भागातील रहिवासी होते. पोलिसांनी त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
रेल्वेने धडक दिली, तिघांचा मृत्यू -
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड पॅसेंजर रेल्वेने या अपघातात तिघांना धडक दिली. घटनास्थळी हजर असलेल्या पाच मित्रांपैकी तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण अपघातातून बचावले. हे तरुण रेल्वे रुळाजवळ उभे होते, तेवढ्यात पुणे स्थानकावरून दौंडच्या दिशेने निघालेल्या पॅसेंजर रेल्वेने त्यांना धडक दिली.
मृतकांची ओळख प्रथमेश नितीन तिंडे (१८), तन्मय महेंद्र तुपे (१८) आणि तुषार शिंदे (१९) अशी झाली आहे. सर्व मृत तरुण हडपसर भागातील गोपाळपट्टी येथील रहिवासी होते.
तपास सुरू -
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस व रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, या तरुणांची रेल्वे रुळाजवळ कशासाठी उपस्थिती होती, त्यांचा काय उद्देश होता, याबाबत तपास सुरू आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे, तपासानंतरच संपूर्ण घटनाक्रम समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
News - Rajy




Petrol Price




