जयपूरमध्ये भीषण अपघात : नशेतल्या डंपर चालकाने १९ जणांना चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जयपूर : नशेच्या नशेत वेगाने धावणाऱ्या डंपरने रविवारी जयपूर शहरात अक्षरशः मृत्यूचा कहर घडवला. बाईकला धडक दिल्यानंतर चालकाने डंपरवर नियंत्रण गमावून रस्त्यावरच्या लोकांना आणि इतर वाहनांना चिरडले. या भीषण अपघातात आतापर्यंत १९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यात डंपर अतिवेगाने जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. धडकेनंतर डंपरखाली अनेक मृतदेह अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना बराच वेळ लागला. या घटनेनंतर परिसरात हाहाकार माजला होता.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. जखमींना तातडीने कांवटिया रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालय परिसरात मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश उसळला असून वातावरण शोकाकुल झाले आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या भीषण घटनेची दखल घेत कॅबिनेट मंत्री सुमित गोदरा आणि सुरेश सिंह रावत यांना तातडीने रुग्णालयात पाठवले. त्यांनी डॉक्टरांना जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या. ट्रॉमा सेंटरचे नोडल अधिकारी बी. एल. यादव यांनी सांगितले की सर्व जखमींवर उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी कांवटिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातामुळे जयपूर शहरात एकच हळहळ व्यक्त होत असून, नशेत वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
News - World




Petrol Price




