महत्वाच्या बातम्या

 अण्णासाहेब पाटील महामंडळ लाभार्थ्यांसाठी सेवा केंद्रात माफक दरात सेवा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता आपले सेवा केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामजस्य करार महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व आपले सेवा केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.

सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने या केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

महामंडळाचे अध्यक्ष म्हणाले, या करारामुळे आमची उदिष्ट्ये अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजू आणि पात्र तरुणांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहचणार आहेत. कमी खर्चात आणि त्यांच्या घराजवळच त्यांना आवश्यक सेवा मिळाल्यामुळे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करुन मराठा समाजातील तरुणांना उद्योजक करण्याचे महामंडळाचा उद्देश पुर्णत्वास नेणे सोपे होईल.

राज्यामध्ये ७२ हजारपेक्षा जास्त सीएससी केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र, कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी, बँकेचा हप्पा अपलोड करण्यासाठी प्रत्येकी ७० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या विकाणी जाण्याची गरज लागणार नाही. ग्रामीण भागातील उद्योजकांना चालना मिळेल.





  Print






News - Wardha




Related Photos