गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांवरून काँग्रेस-दमानीयांचा हल्लाबोल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल व सारंग गडकरी यांच्या कंपन्यांच्या महसूलात झालेली अचानक घसघशीत वाढ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर या कंपन्यांच्या शेअर्स आणि महसूलावरून विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला असून, काँग्रेससोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अंजली दमानिया यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांची घोडदौड सुरूच आहे. मागच्या वर्षी ९ ऑगस्टला शेअरची किंमत ४१ रुपये होती आणि आज ७३६ रुपये? SEBI काय करतंय? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करताना दावा केला आहे की, निखिल गडकरी यांच्या CIAN Agro कंपनीचा महसूल जून २०२४ मध्ये १७ कोटी रुपयांवरून जून २०२५ मध्ये तब्बल ५११ कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच २,९०५ टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली. गेल्या वर्षी जो स्टॉक ४३ होता तो आता ६६८ आहे. म्हणून E२० पेट्रोल भरत राहा, कारण त्यामुळे निखिल गडकरींच्या स्वप्नांना गती मिळते, असा खोचक टोला काँग्रेसने लगावला आहे.
कर्नाटक काँग्रेसनेही अशाच आशयाची पोस्ट करत, निखिल गडकरी यांच्या मालकीच्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीजचा महसूल एका वर्षात १८ कोटींवरून ५२३ कोटींवर पोहोचला. शेअरच्या किमतीत २,१८४ टक्क्यांची वाढ झाली. या जैवइंधन तेजीचा फायदा नेमका कोणाला होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
२०१८ मधील राष्ट्रीय जैवइंधन धोरणात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, मात्र हे लक्ष्य आधीच गाठल्याचा फायदा गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांना झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा कौटुंबिक व्यवसायाचा विजय आहे की जनतेच्या हिताचा प्रश्न? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
News - World




Petrol Price




