उद्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: कास्ट्राईब कर्मचारी महासंघ गडचिरोलीच्या वतीने उद्या  ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 
देशात लोकशाही राज्यव्यवस्था असूनही महाराष्ट्र शासनाने मागील ४ वर्षात मागासवर्गीय समाजाच्या विरोधात अनेक निर्णय घेऊन आपण पेशवाई विचारसरणीचे आहोत हे सिद्ध केले आहे.  याचा निषेध म्हणून कास्ट्राईब राज्य अध्यक्ष  कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार उद्या ३ नोव्हेंबर  रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
यात मागील ४ वर्षात सरळसेवा भरती बंद केल्याने २ लाख ३९ हजार पदांचा अनुशेष राहिल्याचा निषेध,  ११ ऑक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसार   मागासवर्गीय पदोन्नती रोखणे व जाणीवपूर्वक ७८ हजार मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीपासून वंचित ठेवणे, बोगस आदिवासी दाखले देऊन सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे ,जुनी पेन्शन योजना लागू न करणे ,केवळ शिक्षकांची कालबद्ध पदोन्नती रोखण्यासाठी २३ ऑक्टोबर  चा काळा शासन निर्णय काढणे , ७ वा वेतन आयोग लागू करण्यात चालढकल करणे, अशा अनेक निर्णयाविरोधात शासनाची कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी  आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आहे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, राज्य उपाध्यक्ष प्रभाकर सोनडवले, राज्य उपाध्यक्ष गंगाधर मडावी, दिगंबर डोर्लीकर, देवेंद्र डोहने , रायसिंग राठोड, रवींद्र उईके यांनी दिली आहे.   या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-02


Related Photos