सनदी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांना सरकारचा लगाम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्य शासनाने सेवेतील सनदी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर आता कडक निर्बंध लावले आहेत. अभ्यासदौरा आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली वारंवार परदेश वारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी नवे आदेश काढले आहेत.
नवीन आदेशानुसार, परदेश दौऱ्याचा सरकारला नेमका काय उपयोग होणार आहे, याचा तपशील संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. यासोबतच, जर दौरा खासगी संस्थेच्या आमंत्रणावर असेल, तर त्या संस्थेचा प्रकार, उत्पन्नाचे स्रोत, तसेच खर्चाची अंदाजित रक्कमही राज्य शासनास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या निदर्शनास आले आहे की, काही अधिकारी परस्परच परदेश दौऱ्याची आमंत्रणे मिळवतात. दौऱ्याचे प्रस्ताव अनेकदा अपूर्ण असून, कागदपत्रांत त्रुटी व विसंगती असते. काही वेळा तर संपूर्ण पथकच परदेशात रवाना होते. त्यामुळे, अभ्यासदौरा व प्रशिक्षण वगळता अन्य कोणत्याही दौऱ्यात तीनपेक्षा अधिक अधिकारी सहभागी होऊ नयेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, परदेश दौऱ्यासाठी संबंधित मंत्र्यांची मान्यता घेणे आता बंधनकारक असून, ती नसताना दौरा केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेचा गैरवापर रोखला जाणार असून, सरकारी खर्चावर होणाऱ्या अनावश्यक दौऱ्यांना चाप बसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
News - World




Petrol Price




