महत्वाच्या बातम्या

 कोचेवाही सहकारी संस्थेकडून ९२ लाखांची धान फसवणूक : १३ संचालकांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील कोचेवाही येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित (रजि. क्र. ७२२) या संस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करून शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेतील ४,७८४.७२ क्विंटल धानाचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. या धानाच्या मूल्याच्या रूपात शासनाची ९२ लाख ८२ हजार ३५६ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी संस्थेच्या १३ संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशा प्रकारे घडला अपहार -
खरीप हंगाम २०२१-२०२२ मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत, कोचेवाही संस्थेला धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी शासनमान्य अटी व शर्तींनुसार करार करण्यात आला होता. या करारानुसार संस्थेने ११५९ शेतकऱ्यांकडून एकूण ३२,६२१.०५ क्विंटल धान खरेदी केले व ६.३२ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जम केली.

मात्र लेखापरीक्षण अहवालात उघड झाले की, मिलर्सना केवळ २७,८३६.३३ क्विंटल धानच सुपूर्द करण्यात आले होते. उर्वरित ४,७८४.७२ क्विंटल धान संगनमत करून परस्पर गायब करण्यात आला.

गायब झालेल्या धानाची किंमत २२ लाख ८२ हजार ३५६.८० रुपये असून, शासकीय अनुदानातून झालेल्या संपूर्ण खरेदी रकमेचा विचार करता फसवणुकीचा आकडा ९२.८२ लाखांपर्यंत पोहोचतो.

१३ संचालकांविरोधात गुन्हा -
संस्थेच्या संचालक मंडळातील खालील १३ व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व संचालक सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीत कार्यरत होते.

माधोसिंह धर्मसिंह परिहार (अध्यक्ष), चोखलाल केवल जांभरे, प्रेमलाल धडुजी टेंभरे, कमलचंद धनीराम ढोडरमल, उद्देलाल फतू पाचे, सुरेश नतुभाऊ भक्तवर्ती, रमेश गेंदलाल कावरे, ब्रिजलाल शंकर सोनवाने, कृष्णकुमार आसाराम गजभिये, हुमेंद्र पुरनलाल पटले, देवेंद्र गेंदलाल बागडे, पुस्तकला परसराम परिहार, सुनीता छेदीलाल पाचे

शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा, शासनाच्या निधीचा अपव्यय -
शासनाच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून त्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी सहकारी संस्थेवर असते. मात्र, संस्थेच्या संचालकांनीच संगनमत करून शासनाचा निधी व धानाचा अपहार केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच शासनाच्या निधीचे संरक्षण व्हावे, अशी शेतकरी संघटनांकडून जोरदार मागणी केली जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos