बंदराचा पाठलाग ठरला बिबट्याच्या जीवावर बेतला : विजेच्या धक्क्याने मादी बिबट्या व बंदराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बंदराचा पाठलाग करताना विद्युत डीपीवर चढलेल्या मादी बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपवनक्षेत्राच्या वगाडपेठ परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत बिबट्याचा पाठलाग करणाऱ्या बंदराचाही मृत्यू झाला.
पिंपळगाव येथील शेतकरी महादेव धारणे यांच्या शेतात विद्युत डीपी आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास या डीपीवर बंदर असल्याचे दिसून आले. त्याच्या पाठलाग करत मादी बिबट्या डीपीवर चढली असावी. यावेळी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून बिबट्या आणि बंदराचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
सोमवारी सकाळी महादेव धारणे शेतात गेले असता त्यांना डीपीजवळ बिबट्या आणि बंदर मृतावस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक आमोद गौरकर, वनपाल राजेंद्र मेश्राम, वनरक्षक कालिदास गायकवाड आणि वनमजूर घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृत प्राण्यांना खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. त्यानंतर ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक आमोद गौरकर, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. रमेशकुमार ओव्हाळ, शंकरपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, चैतन्य सोनुले, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनपाल राजेंद्र मेश्राम आणि वनरक्षक कालिदास गायकवाड यांच्या उपस्थितीत दोन्ही प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार त्यांचे दहन करण्यात आले.




Petrol Price




