महत्वाच्या बातम्या

 नांगरणी करताना बैल उधळले : नांगरासह पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू


- कोरेगाव येथील शेतातील दुर्दैवी घटना; ६२ वर्षीय चिंतामण राऊत यांचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : स्वतःच्या शेतात बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करीत असताना अचानक बैल उधळल्याने नांगरासह जमिनीवर कोसळून गंभीर दुखापत झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिंतामण नकटू राऊत ६२ वर्षे, रा. चोप असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामण राऊत हे २६ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतात बैलजोडीच्या मदतीने नांगरणी करीत होते. शेतीचे काम सुरू असताना अचानक बैलजोडी बुजाडून उधळली. त्यामुळे नांगरावर नियंत्रण ठेवणे त्यांना शक्य झाले नाही आणि ते नांगरासह जमिनीवर कोसळले.

या दुर्घटनेत त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांकडून घेण्यात आली असून, पोलिस निरीक्षक स्वप्निल इजपवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रियंका बावणे, हवालदार मुरारी गेडाम आणि जयपाल बांबोळे पुढील तपास करीत आहेत.शेतीच्या कामादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चोप परिसरात शोककळा पसरली असून, एका शेतकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos