महत्वाच्या बातम्या

 अम्मा का टिफिन परिवाराचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात


- ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार; दररोज ३०० हून अधिक गरजूंना घरपोहोच जेवणाची सेवा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गरजू, निराधार आणि एकाकी ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने दोन वेळचे जेवण मिळावे, या सामाजिक भावनेतून आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला अम्मा का टिफिन उपक्रम आज अनेक गरजूंसाठी आधार ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज ३०० हून अधिक गरजू नागरिकांना घरपोहोच जेवणाचे डबे पोहोचविले जातात. विशेष म्हणजे, या सेवेला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत एकाही दिवसाचा खंड पडलेला नाही. अन्नदानासोबतच आपुलकी, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम आता एका मोठ्या परिवाराचे रूप धारण करीत आहे.

दिवाळीच्या निमित्ताने शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी अम्मा का टिफिन परिवाराच्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या उपक्रमाशी जोडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार त्यांना औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले. दिवाळीच्या आनंदात ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूही देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, प्रसाद किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर काताडे, ‘अम्मा का टिफिन’ उपक्रमाच्या संयोजिका सविता दंढारे, पवन सफार, रवि गुरनुले, निलिमा वनकर, अल्का मेश्राम आणि कौसर खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, अम्मा का टिफिन हा केवळ जेवणाचा डबा पोहोचविणारा उपक्रम नसून आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक परिवार आहे. समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे व्यक्ती आणि गरजू कुटुंबे आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज दररोज ३०० हून अधिक नागरिकांपर्यंत जेवण पोहोचविले जात असून, या सेवेत आजपर्यंत एकही दिवस खंड पडलेला नाही, ही समाधानाची आणि अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गरजूंना दिले जाणारे जेवण आमदारांच्या राजमाता निवासस्थानी तयार केले जाते. जेवण बनविण्यापासून ते गरजूंपर्यंत पोहोचविण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपुलकीची भावना जपली जाते. अम्मा म्हणजे आई. आईकडून मिळालेले संस्कार आणि समाजातील गरजूंबद्दलची संवेदनशीलता यातूनच या उपक्रमाची प्रेरणा मिळाली आहे.

केवळ गरजूंचे पोट भरणे हा उद्देश नसून त्यांच्या आयुष्यात आपलेपणाची भावना निर्माण करणे, त्यांची विचारपूस करणे आणि त्यांना कुटुंबाचा आधार देणे हे या उपक्रमाचे खरे उद्दिष्ट आहे. भविष्यातही या सेवेला अधिक व्यापक स्वरूप देत सातत्याने गरजूंच्या सेवेत कार्यरत राहण्याचा संकल्प असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा असल्याचे नमूद केले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर काताडे यांनीही या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना केवळ मदतच मिळत नाही, तर त्यांच्या मनात सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावनाही निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या आनंदात ‘अम्मा का टिफिन’ परिवारातील ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहमिलन, आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि भेटवस्तू वितरण अशा विविध उपक्रमांमुळे हा सोहळा उत्साहात पार पडला. अन्नदानासोबतच आरोग्याची काळजी, जिव्हाळा आणि माणुसकीची जोड देणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक सेवेचा एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे.





  Print






Related Photos