महत्वाच्या बातम्या

 शिवणी गावाजवळ एसटी बस पलटी : ३१ प्रवासी जखमी


- स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती; २९ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया

विदर्भ न्यूज प्रतिनिधी 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या एसटी बसला शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास शिवणी गावाजवळ अपघात झाला. बसचे अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत सुमारे ३१ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यापैकी २९ जखमी प्रवाशांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, MH ०६ ८८४८ क्रमांकाची ही बस गडचिरोलीहून चामोर्शीकडे प्रवासी घेऊन जात होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये तब्बल ६८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये एका लहान चिमुकल्याचाही समावेश होता. बस अचानक रस्त्यावर पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघातानंतर जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात? -
अपघाताच्या कारणाबाबत बसचालकाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस सुरू असतानाच अचानक स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

जुन्या बसगाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर -
या अपघाताच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या व भंगार अवस्थेतील बसगाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही बसचे चाक निखळल्याने दोन वेळा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताच्या दृष्टीने बसगाड्यांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील खड्ड्यांचाही मुद्दा -
दरम्यान, चामोर्शी-गडचिरोली राष्ट्रीय मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्नही या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुढे आला आहे. मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, खराब रस्त्यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या संबंधित यंत्रणांवर कारवाई करावी, तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर जुन्या बसगाड्यांची तांत्रिक तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

शिवणीजवळील या बस अपघातामुळे रस्त्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांची सुरक्षितता हे दोन्ही प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून, प्रशासन या प्रकरणी काय उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos