एक ब्रास रेतीसाठी आठ लाखांचा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात!


- तुमसर बायपासवर ८.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; मोहाडीतही अवैध रेती वाहतुकीवर कारवाई, चालक ट्रॅक्टर सोडून फरार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार सुरूच असून, त्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तुमसर आणि मोहाडी परिसरात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करून अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहेत. तुमसर येथे केवळ अंदाजे एक ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक करणारा तब्बल ८ लाख ६ हजार रुपयांचा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मोहाडी तालुक्यातील सूर नदीपात्रातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत ६ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या दोन्ही कारवायांमुळे अवैध रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
तुमसर बायपासवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई -
तुमसर शहरातील बायपास रोड परिसरातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या तुमसर उपविभागीय पथकाला शनिवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सकाळी १० वाजताच्या सुमारास संबंधित परिसरात धाव घेत वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी नरेंद्र भीमराव उईके (वय २४, रा. पिपरा, ता. तुमसर) हा एमएच ३६ एजी २१५० क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्यामधून अंदाजे एक ब्रास रेती विनापरवाना वाहून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ ट्रॅक्टर अडवून तपासणी केली. रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरुद्ध तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर नदीपात्रात पोलिसांची धडक; चालक ट्रॅक्टर सोडून फरार दरम्यान, मोहाडी तालुक्यातील खमारी (बु.) परिसरातही अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास सूर नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हवालदार त्रिमूर्ती केशवराव लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने सूर नदीपात्रात धडक कारवाई केली. पोलिस आल्याचे लक्षात येताच ट्रॅक्टरचालकाने ट्रॉलीतील रेती नदीपात्रात खाली केली आणि ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, चोरखमारी मार्गावर चालकाने ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी ट्रॅक्टर (एमएच ३६ एआर ४०२७), विना क्रमांकाची ट्रॉली आणि रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चार फावडी असा एकूण ६ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नदीपात्रात टाकण्यात आलेल्या अंदाजे एक ब्रास रेतीची किंमत सुमारे सहा हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार ट्रॅक्टरचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अवैध रेती वाहतूकदारांवर पोलिसांची करडी नजर -
तुमसर आणि मोहाडी परिसरात झालेल्या या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १४ लाख ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी अंदाजे प्रत्येकी एक ब्रास रेतीची वाहतूक होत असताना लाखो रुपये किमतीची वाहने पोलिसांच्या ताब्यात आली आहेत. मोहाडी येथील कारवाईत चालकाने पोलिसांना पाहताच रेती नदीपात्रात टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर-ट्रॉली सोडून फरार व्हावे लागल्याने त्याचे वाहन पोलिसांच्या ताब्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जगदीश पालीवाल या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. जिल्ह्यातील नदीपात्रांमधून होणारे अवैध रेती उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.




Petrol Price




