महत्वाच्या बातम्या

 गौरी विसर्जनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा भीषण हल्ला : जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावपळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गौरी विसर्जनासाठी तलाव व नाल्याच्या परिसरात गेलेल्या महिलांवर मधमाशांच्या मोठ्या थव्याने अचानक हल्ला केल्याच्या दोन घटना मंगळवारी सकाळी घडल्या. सावली येथील गाव तलाव परिसरातील घटनेत आठ महिला जखमी झाल्या असून, कोठारी परिसरातही अनेक महिलांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गौरी विसर्जनाचा विधी अर्धवट सोडून महिलांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी सैरावैरा धाव घ्यावी लागली.

सावली येथील गाव तलावावर सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तलावाच्या पाळीवर असलेल्या वडाच्या झाडावर मधमाशांचे मोठे मोहळ होते. अचानक या मोहळातून मधमाशांचा थवा बाहेर पडला आणि उपस्थित महिलांवर तुटून पडला. काही क्षणांतच परिसरात आरडाओरड व गोंधळ उडाला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी मिळेल त्या दिशेने धाव घेत सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात वर्षा सुरेश कोसरे, छाया संजय कोसरे, रुपाली सत्यवान कोसरे, शीतल अनिकेत कोसरे यांच्यासह आठ महिला जखमी झाल्या. मधमाशांच्या दंशामुळे जखमी झालेल्या महिलांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. हल्ल्यामुळे झालेल्या गोंधळात रुपाली सत्यवान कोसरे यांचा सोन्याचा दागिनाही हरवल्याची माहिती असून, तो नेमका कुठे पडला याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, कोठारी परिसरातही गौरी विसर्जनासाठी गावालगतच्या नाल्याजवळ गेलेल्या महिलांवर मधमाशांच्या मोठ्या थव्याने अचानक हल्ला केला. गौरी पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने विसर्जनाचा विधी सुरू असतानाच मधमाशा महिलांच्या दिशेने आल्या. काही कळण्याच्या आतच त्यांनी महिलांना दंश करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी महिलांनी आरडाओरड करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही महिलांनी नाल्यातील गौरी तशाच सोडून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला. हल्ल्यात अनेक महिलांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले.

गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने महिला एकत्र येत असलेल्या ठिकाणी मधमाशांचे मोहळ असल्याची माहिती असतानाही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तलाव, नाले तसेच सार्वजनिक विसर्जनस्थळांच्या परिसरातील झाडांवर असलेली मोठी मधमाशांची मोहळे वेळीच हटवून अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






Related Photos