महत्वाच्या बातम्या

 श्री गुरु नानक देव जी जयंतीनिमित्त किसान नगर येथील गुरुद्वारात डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले दर्शन!


- रक्तदान शिबिराला भेट देत रक्तदात्यांचे केले कौतुक; गुरुद्वारा बांधकामासाठी सहकार्याचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली : शीख धर्माचे संस्थापक, महान संत व मानवतेचा संदेश देणारे श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त सावली तालुक्यातील किसान नगर येथील श्री गुरु नानक शाही गुरुद्वारात भक्तिमय वातावरणात गुरुपर्व साजरा करण्यात आला. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरु नानक देव जी यांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. उपस्थित शीख बांधव, गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी व भाविकांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान! -
श्री गुरु नानक शाही गुरुद्वारा सेवा समिती किसान नगर च्या वतीने जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी भेट दिली. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. गुरुपर्वासारख्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून समितीने राबविलेला हा सेवाभावी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

या रक्तदान शिबिरात त्यावेळेपर्यंत एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते, तर रक्तदान शिबिराची प्रक्रिया पुढेही सुरू होती. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी गुरुद्वारा परिसरातील आवश्यक बांधकामासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. नेते यांच्याशी चर्चा केली. गुरुद्वारा बांधकामासाठी आवश्यक ते प्रयत्न करून शक्य ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी पामी सलोजा, संजय मजोके, योगेश गलगट, शैलेश मजोके, प्रदीप सुरे, मुकेश बिके यांच्यासह अनेक शीख बांधव, भगिनी व भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गुरुद्वारा सेवा समितीच्या वतीने डॉ. अशोकजी नेते यांचा सन्मान करण्यात आला. श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेसोबतच मानवसेवा, सामाजिक एकोपा आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.





  Print






Related Photos