महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान


- प्रलंबित जमिनींचे व महसुली वाद तडजोडीतून निकाली काढणार; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान विशेष लोक अदालत कॅम्प

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले जमिनींचे व महसुली वाद जलदगतीने आणि परस्पर सहमतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

या अभियानामुळे जमिनींच्या हक्कांशी संबंधित वाद, फेरफार नोंदी, महसुली रस्त्यांचे वाद, भूसंपादन भरपाई तसेच विविध अपील आणि पुनरीक्षण अर्ज अशा प्रकरणांमध्ये तडजोडीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

विविध प्रकारच्या महसुली प्रकरणांचा समावेश -
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत महसूल विभागाच्या विविध स्तरांवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी स्तरावरील फेरफार नोंदींसंदर्भातील प्रकरणे, तहसीलदार व नायब तहसीलदार स्तरावरील महसुली रस्त्यांचे वाद तसेच मामलेदार न्यायालय अधिनियमाच्या कलम ५ अंतर्गत येणारे रस्ता विवाद या प्रकरणांचा त्यात समावेश आहे.

याशिवाय, उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) स्तरावरील भूसंपादन भरपाई व तडजोडीशी संबंधित दावेही निकाली काढण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी स्तरावरील पुनरीक्षण अर्ज, अपील तसेच अन्य अर्धन्यायिक प्रकरणांचाही या अभियानात समावेश करण्यात आला आहे.

दोन्ही पक्षकारांची तडजोड करण्याची तयारी आणि परस्पर सहमती असल्यास संबंधित प्रकरणांचा कायदेशीर प्रक्रियेनुसार निपटारा करण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे.

भंडारा जिल्ह्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर -
भंडारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या स्तरावर विशेष लोक अदालत कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.

अपर जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या स्तरावरील लोक अदालत कॅम्पचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे -
३० ऑक्टोबर २०२६ : भंडारा व पवनी तालुक्यांतील प्रकरणांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे लोक अदालत कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे.
२६ नोव्हेंबर २०२६ : तुमसर व मोहाडी तालुक्यांतील प्रकरणांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तुमसर येथे कॅम्प होणार आहे.
१७ डिसेंबर २०२६ : साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यांतील प्रकरणांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, साकोली येथे लोक अदालत कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे.

या कॅम्पच्या माध्यमातून संबंधित तालुक्यांतील अपर जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित असलेल्या पात्र प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी व भूसंपादन प्रकरणांसाठी दोन फेऱ्या -
उपविभागीय अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) स्तरावरील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दोन फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, पहिली फेरी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरी फेरी १६ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी स्तरावरील प्रलंबित प्रकरणांसाठी पहिली फेरी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरी फेरी १५ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या नियोजनानुसार विविध स्तरांवरील महसुली प्रकरणांची छाननी करून तडजोडीस पात्र असलेल्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तोडगा काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

तडजोडीसाठी प्रपत्र-अमध्ये अर्ज करणे आवश्यक -
या अभियानाचा लाभ घेण्यासाठी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणात तडजोड करण्यास इच्छुक असलेल्या दोन्ही पक्षकारांनी स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत प्रपत्र-अमध्ये तडजोडनामा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून कायदेशीर छाननी करण्यात येईल. त्यानंतर दोन्ही पक्षकारांच्या संमतीने तडजोडनामा तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. लोक अदालतीच्या दिवशी ज्या प्रकरणांमध्ये परस्पर सहमतीने तडजोड होईल, त्या प्रकरणांमध्ये नियमानुसार अंतिम आदेश पारित करून संबंधित दावे निकाली काढण्यात येणार आहेत.

त्यामुळे ज्या नागरिकांचे जमिनींचे किंवा अन्य महसुली वाद महसूल प्रशासनाच्या विविध स्तरांवर प्रलंबित आहेत, त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून या अभियानातील प्रक्रियेची माहिती घ्यावी आणि आवश्यक अर्ज सादर करावेत.

प्रलंबित वाद निकाली काढण्याची संधी -
महसुली व जमिनींसंबंधीचे वाद अनेकदा दीर्घकाळ प्रलंबित राहतात. त्यामुळे संबंधित नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. अशा प्रकरणांचा परस्पर सहमतीने निपटारा झाल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो, तसेच महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा’ जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले प्रलंबित महसुली व जमिनींसंबंधीचे वाद परस्पर सहमतीने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी गावोगावी या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी आणि अधिकाधिक पात्र प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.





  Print






Related Photos