शिर्सी-गणेशपूर शिवारात रानटी हत्तींचा धुडगूस : काढणीच्या तोंडावर धान पिकाची नासाडी


- शिर्सी-गणेशपूर शिवारात रानटी हत्तींचा धुडगूस
- काढणीच्या तोंडावर उभे धान पीक तुडविले; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सिर्सी उपवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिर्सी आणि गणेशपूर येथील शेतशिवारात रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा धुडगूस घालत शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री हत्तींच्या कळपाने शेतात प्रवेश करून काढणीच्या तोंडावर आलेले धान पीक तुडवून उद्ध्वस्त केले. ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, परिसरात वन्यहत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप शिर्सी, गणेशपूर परिसरात ठाण मांडून आहे. यापूर्वीही याच कळपाने २९ ऑगस्ट आणि १२ सप्टेंबर रोजी शेतशिवारात प्रवेश करून धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली होती. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच १४ सप्टेंबरच्या रात्री पुन्हा हत्तींनी शेतात प्रवेश केला.
रात्रीच्या अंधारात शेतात घुसलेल्या हत्तींच्या कळपाने उभ्या धान पिकातून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात पीक तुडवून टाकले. अनेक शेतकऱ्यांचे पीक काढणीला आलेले असल्याने या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. वर्षभर मेहनत करून तयार केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पिकांचे अवशेषच उरले आहेत.
वन विभागाकडून नुकसानीची पाहणी -
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिर्सीचे क्षेत्र साहाय्यक आर. टी. समर्थ आणि वनरक्षक एस. के. वाळके यांनी कर्मचाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी हत्तींच्या कळपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून सविस्तर मोका पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. शासनाकडून नियमानुसार जास्तीत जास्त आणि तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
केवळ नुकसानभरपाई नको; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी -
रानटी हत्तींच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शिर्सी आणि गणेशपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीसोबतच संतापाचे वातावरण आहे. दर काही दिवसांनी हत्तींचा कळप शेतात घुसत असल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. केवळ नुकसान झाल्यानंतर पंचनामा करून नुकसानभरपाई देणे हा या समस्येवर कायमस्वरूपी उपाय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखून त्यांना शेती आणि मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी शिर्सी व गणेशपूर येथील त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
थातूरमातूर उपाययोजनांवर नाराजी -
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांसह आरमोरी तालुक्यातही रानटी हत्तींच्या कळपाचा उपद्रव वाढला आहे. हत्तींच्या हालचालींमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. हत्तींचा कळप वारंवार त्याच परिसरात परतत असल्याने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. शासन आणि वन विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करावे आणि रानटी हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.




Petrol Price




