पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचा कृती आराखडा

- जलसाठ्यांचे संरक्षण, बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यावर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण, अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण आणि बंधाऱ्यांमधील पाणीसाठा वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत, जलाशय, नद्या, तलाव, बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, विहिरी, कूपनलिका आणि पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव जलसाठ्यांमधून विनापरवाना पाणी उपसा होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. विद्युत मोटारी, पंप, टँकर, सायफनिंग अथवा अनधिकृत जोडण्यांद्वारे होणाऱ्या पाणी उपशामुळे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यानंतर उपलब्ध पाणी अधिकाधिक काळ साठवून ठेवण्यासाठी सर्व लघु पाटबंधारे उपविभाग आणि ग्रामपंचायतींना नाले व नैसर्गिक जलप्रवाहांवर वनराई बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वाहून जाणारे पाणी अडविणे, स्थानिक पातळीवर जलसाठा निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरणास मदत होईल.
अस्तित्वातील बंधाऱ्यांना गेट बसवून पाणी अडविण्याची कामे सुरू : लघु पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी आवश्यक ठिकाणी पाट्या (गेट) बसविण्याची कामे उपविभागांमार्फत सुरू करण्यात आली आहेत. तसेच सिमेंट प्लग बंधारे, माजी मालगुजारी तलाव, लघु पाटबंधारे तलाव आणि साठवण तलावांमधील उपलब्ध पाण्याचे संरक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे. सन २०२६-२०२७ च्या नियोजनात गेटअभावी पाणीसाठा होत नसलेल्या बंधाऱ्यांना नवीन पाट्या बसविण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय, दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या बंधाऱ्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत.
पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन -
पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता आणि उपलब्ध जलसाठ्यांचे संवर्धन हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत असून, सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
पाणी बचतीसाठी नागरिकांना आवाहन -
संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अनावश्यक पाणी वापर टाळावा, नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे, अंगण स्वच्छ करणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी करू नये. शेतकरी बांधवांनीही उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून पाणीबचतीच्या उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप खंबाईत यांनी केले आहे.




Petrol Price




