महत्वाच्या बातम्या

 सर्वोदय विद्यालय बल्लारपूर येथे अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि मातृभाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे केली. काही विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या भाषणातून मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि मातृभाषेबद्दलची आत्मीयता दिसून आली.

यावेळी शिक्षिका मारपल्लीवार यांनी अभिजात मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. मराठी भाषेला लाभलेली समृद्ध साहित्यिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मातृभाषेचा वापर वाढविण्यासोबतच तिचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गजभे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून मराठी भाषेचे जतन व संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन केले. बदलत्या काळात इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करताना आपल्या मातृभाषेची नाळ कायम घट्ट ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शाळेचे सकाळ पाळी प्रमुख जयप्रकाश गाडगीलवार, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.





  Print






Related Photos