महत्वाच्या बातम्या

 विशेष लोकअदालतीत २४ प्रकरणांचा आपसी तडजोडीतून निपटारा


- परिक्राम्य लेख अधिनियमाच्या कलम १३८ अंतर्गत प्रकरणे निकाली

- तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य २२ लाख ९६ हजार ९७४ रुपये

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होऊन पक्षकारांना सुलभ व त्वरित न्याय मिळावा, या उद्देशाने वर्धा जिल्हा न्यायालयात आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये परक्राम्य लेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत एकूण २४ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य २२ लाख ९६ हजार ९७४ इतके आहे.

राष्ट्रीय विधी सेवा समिती, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष लोकअदालतीमुळे दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. परस्पर संमतीने वाद मिटविण्याची संधी उपलब्ध होत असल्याने पक्षकारांचा वेळ आणि पैशांची बचत होते. न्यायालयीन प्रक्रियेतील ताण कमी होण्यासोबतच मनासारख्या तडजोडीतून मानसिक समाधानही मिळते. लोकअदालतीच्या माध्यमातून वाद सामंजस्याने मिटविण्याची ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी यावेळी नमूद केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजीव आ. सरदार यांनी विशेष लोकअदालतीच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. वादापेक्षा तडजोडीला प्राधान्य देऊन पक्षकारांनी आपापसातील मतभेद सामंजस्याने मिटवावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वर्धा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, जिल्ह्यातील वकील तसेच पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करणे शक्य झाले.

विशेष लोकअदालतीच्या माध्यमातून परस्पर संमतीने वाद मिटविण्याच्या संकल्पनेला अधिक बळ मिळाले असून, न्यायव्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.





  Print






Related Photos