महत्वाच्या बातम्या

 बालपणाच्या शाळेत पुन्हा माजी विद्यार्थी !


- जुन्या आठवणींना उजाळा; शाळा विकासासाठी सहकार्याचा निर्धार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : बालपणीच्या आठवणी, गुरुजनांचे संस्कार आणि शाळेने दिलेल्या शिक्षणाचे ऋण व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या जुन्या शाळेच्या अंगणात एकत्र आले. पंचायत समिती अहेरी अंतर्गत वेलगूर केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मद्दीगुडम येथे गुरुवारी १ ऑक्टोबर माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन ग्रामसेवक मुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष समय्या चिंतावार, उपाध्यक्ष दर्शन पोटे, पदवीधर शिक्षक खुर्शीद शेख, गट साधन अधिकारी रामटेके,केंद्रप्रमुख पूरकलवार, माजी उपसरपंच मल्लेश तोटावार, पुणेश कंदीकूरवार, शुभम चिंतावार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पोटे, महेश अप्पलवार यांच्यासह माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी थोर पुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘सुस्वागतम् सुस्वागतम्’ या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. महात्मा गांधी यांच्या जीवनमूल्यांवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन माजी उपसरपंच मल्लेश तोटावार यांच्या हस्ते करण्यात आले.

पदवीधर शिक्षक खुर्शीद शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खर्रा-गुटख्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच शाळेविषयी प्रेम, आपुलकी व अभिमान जपण्याचा संदेश दिला. मुख्याध्यापिका मुधोळकर यांनी शाळेच्या सुविधा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. ग्रामसेवक मुळे यांनी शाळा व अंगणवाडीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची भावना व्यक्त केली.

यावेळी माजी विद्यार्थी व युवकांनी शाळेतील सुविधा आणि विकासासंदर्भातील विविध प्रश्न ग्रामसेवकांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबरी मडावी यांनी केले, तर आभार स्मिता राऊत  यांनी मानले. माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळावा आपुलकीच्या वातावरणात पार पडला.





  Print






Related Photos