महत्वाच्या बातम्या

 दिवाळीच्या सुट्ट्यांतही विद्यार्थ्यांना गृहपाठाचा बोजा : शाळांमधून पुस्तकांची चढ्या दराने विक्री!


- २० रुपयांचे पुस्तक ४० ते ५० रुपयांना विक्री; प्रति पुस्तक २० रुपये कमिशन मिळत असल्याचा पालकांचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे चिमुकल्यांसाठी आनंद, उत्साह, मजा आणि धमाल करण्याची पर्वणी असते. यंदा ५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. मात्र, या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती मिळण्याऐवजी त्यांच्या माथी गृहपाठाचा बोजा टाकण्याचा प्रकार भंडारा शहरातील काही खासगी अनुदानित शाळांमध्ये सुरू असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. दिवाळी गृहपाठाच्या नावाखाली शाळांमधूनच सराव पुस्तकांची विक्री केली जात असून, बाजारात २० रुपयांना उपलब्ध असलेले पुस्तक शाळांमध्ये ४० ते ५० रुपयांना विकले जात असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गृहपाठाची विशेष सराव पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बाजारात सवलतीच्या दरात २० रुपयांना मिळणारी ही पुस्तके शाळांमधून मात्र दुप्पट दराने विकली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासातून थोडी विश्रांती मिळावी, मनोरंजन करता यावे आणि कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने दिल्या जातात. मात्र, गृहपाठाच्या नावाखाली सराव पुस्तकांचा अतिरिक्त भार विद्यार्थ्यांवर टाकला जात असल्याने त्यांच्या सुट्टीचा आनंद हिरावला जात असल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत.

प्रति पुस्तक २० रुपये कमिशन मिळत असल्याचा आरोप -
ठराविक प्रकाशन संस्थांच्या एजंटांशी संगनमत करून प्रत्येक पुस्तकामागे शाळांना २० रुपये कमिशन मिळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे बाजारात स्वस्त दरात उपलब्ध असलेली पुस्तके शाळांमधून अधिक किमतीत खरेदी करण्यास पालकांना भाग पाडले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पुस्तकांच्या विक्रीतून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशानेच विद्यार्थ्यांना ही पुस्तके घेण्यास प्रवृत्त केले जात असल्याची चर्चा पालकवर्गात सुरू आहे. या व्यवहारामागील आर्थिक हितसंबंधांची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

मोफत शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह -
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमधून शैक्षणिक साहित्याची विक्री केली जात असल्याच्या प्रकारावर पालकांनी आक्षेप घेतला आहे. दिवाळी गृहपाठाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याने मोफत शिक्षणाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या नावाखाली अतिरिक्त गृहपाठ दिला जात असताना दुसरीकडे पालकांवर अनावश्यक आर्थिक भार टाकला जात असल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शाळांमधील पुस्तक विक्री, पुस्तकांचे दर आणि प्रति पुस्तक कमिशनच्या आरोपांची सखोल चौकशी करावी. तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.





  Print






Related Photos