महत्वाच्या बातम्या

 जल, जंगल आणि जमिनीच्या अधिकारांच्या लढ्यापासून ते जनजातीय गौरवापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास


- भगवान बिरसा मुंडा यांचे आदर्श आत्मसात करावेत : आमदार विनोद अग्रवाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : धरती आबा अमर वीर हुतात्मा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त गोंदिया विधानसभा क्षेत्रात उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभा क्षेत्रातील चुटिया, सितुटोला, दासगाव, लहीटोला आणि भागवटोला/हिवरा या गावांमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. तसेच आदिवासी समाजबांधवांना जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमांना संबोधित करताना आमदार विनोद अग्रवाल यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनाचा, अदम्य साहसाचा, सामाजिक जाणीवेचा आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा गौरवशाली इतिहास ग्रामस्थांसमोर मांडला. ते म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे केवळ महान क्रांतिकारक नव्हते, तर ते आदिवासी अस्मिता, स्वाभिमान, हक्क आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन अन्याय आणि शोषणाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देते. आज समाजाने त्यांच्या विचारांतून, आदर्शांतून आणि संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन ते आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे.

आमदार अग्रवाल म्हणाले की, आदिवासी समाज हा या देशाचा मूळनिवासी समाज असून, या समाजाने शतकानुशतके जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला आहे. आपले हक्क, संस्कृती, परंपरा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या समाजाने दीर्घ लढा दिला आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध ज्या धैर्याने आवाज उठवला, तो भारतीय इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे. आज केंद्र सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाचा आणि योगदानाचा सन्मान करून त्यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण आदिवासी समाजाच्या गौरवाचा आणि सन्मानाचा प्रतीक आहे.

वनहक्क मिळूनही फार्मर आयडीअभावी धान विक्री आणि बोनसपासून शेतकरी होते वंचित -
आमदार विनोद अग्रवाल यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या एका महत्त्वपूर्ण समस्येकडे लक्ष वेधताना सांगितले की, वनहक्क कायद्यांतर्गत वनजमिनीवर हक्क मिळूनही अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या शेतमालाची, विशेषतः धानाची विक्री करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. फार्मर आयडीअभावी हे शेतकरी शासकीय धान खरेदी योजनेचा लाभ, धानावर मिळणारा बोनस तसेच शेतीशी संबंधित इतर शासकीय सुविधांपासूनही वंचित राहत होते.

ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने या समस्येची गांभीर्याने दखल घेत अशा सर्व पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळू शकेल. फार्मर आयडी तयार झाल्यानंतर शेतकरी आपले धान शासकीय धान खरेदी केंद्रांवर विकू शकतील. तसेच धान बोनस, नैसर्गिक आपत्ती अथवा पीक नुकसानीपोटी मिळणारी आर्थिक मदत आणि विविध कृषी योजनांचाही लाभ घेऊ शकतील.

आमदार अग्रवाल यांनी विशेषत्वाने स्पष्ट केले की, या निर्णयाचा लाभ केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित नसून, १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून अतिक्रमित जमिनीवर शेती करून त्याचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. म्हणजेच, निर्धारित पात्रतेच्या निकषांत बसणाऱ्या अशा शेतकऱ्यांनाही फार्मर आयडीच्या माध्यमातून कृषी सुविधा आणि शासकीय योजनांशी जोडण्याचे काम करण्यात येत आहे. ते म्हणाले की, केवळ तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या अडचणींमुळे पात्र शेतकरी आपल्या हक्कांपासून आणि अधिकारांपासून वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश आहे.

आमदार विनोद अग्रवाल पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाचा विकास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसावा, तर त्यांच्या संस्कृतीचे, परंपरांचे, अस्मितेचे आणि अधिकारांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हाच आमचा संकल्प आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाने शिक्षण, शेती, सामाजिक जागरूकता आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे पुढे यावे.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार विनोद अग्रवाल यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानाला अभिवादन करत आदिवासी समाजाचा गौरव, त्यांचे हक्क आणि सर्वांगीण विकासाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली. विविध गावांमध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ आणि समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.





  Print






Related Photos