महत्वाच्या बातम्या

 मूल पोलिसांचा पाणीपुरवठा योजनेतील चोरीचा छडा : सहा आरोपी अटकेत, ९.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनासुर्ला येथील २४ ग्रीड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत चोरी करून नुकसान केल्याच्या प्रकरणाचा मूल पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरी गेलेला ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन वाहने, असा एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी सचिन पुंडलिक निकुरे २७ वर्ष, सत्यपाल पुरुषोत्तम बावणे ३५ वर्ष, प्रकाश संताजी चटारे ४५ वर्ष, हेमराज जनार्दन वाढगुरे ३७ वर्ष आणि प्रबुद्ध सिद्धार्थ रामटेके ३२ वर्ष, सर्व रा. चिरोली, ता. मूल तसेच शोएब खान पठाण (रा. मूल) यांना अटक करण्यात आले आहे.

मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील २४ ग्रीड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी १७ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोरी करून नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अंकित रवींद्र नंदनवार ३३ वर्ष यांनी १ नोव्हेंबर रोजी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तपासादरम्यान गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सहा आरोपींना निष्पन्न केले. त्यांच्याकडून चोरी गेलेला ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५ लाख ९० हजार रुपये किमतीची तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके व गुन्हे शोध पथकाने केली.





  Print






Related Photos