सन्मित्र सैनिक विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; गावात पोहोचण्यापूर्वीच पित्याला आला फोन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : हसतखेळत मुलाला शाळेत सोडून पिता आपल्या गावाकडे परतत होता. मात्र, गावात पोहोचण्यापूर्वीच शिक्षकाचा फोन आला आणि अवघ्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडली. काही तासांपूर्वी डोळ्यांसमोर असलेल्या लेकराच्या मृत्यूची बातमी ऐकताच पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विसापूर येथील सन्मित्र सैनिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या जीवन विलास झरेकर या विद्यार्थ्याचा गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, जीवनच्या शरीरावर फुरळ आल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच विद्यालयातील इतरही अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर फुरळ आल्याची माहिती समोर येत असल्याने या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. जीवन झरेकर हा राजुरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवासी होता. तो विसापूर येथील भिवकुंड परिसरातील सन्मित्र सैनिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी त्याच्या शरीरावर फुरळ आल्यामुळे वडिलांनी त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, रुग्णालयात त्याला कोणतीही औषधे किंवा इंजेक्शन देण्यात आले नसल्याचे वडिलांनी सांगितले.
त्यानंतर वडिलांनी जीवनला सायंकाळी शाळेत सोडले आणि ते आपल्या गावाकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, ते गावात पोहोचण्यापूर्वीच एका शिक्षकाचा त्यांना फोन आला. या फोनवरून त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. काही वेळापूर्वीच मुलाला शाळेत सोडून आलेल्या पित्याला अचानक त्याच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने झरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्राथमिक माहितीनुसार, जीवन विद्यालयाच्या परिसरात गंभीर अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवघ्या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने विद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, विद्यालयातील इतर अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावरही फुरळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर फुरळ येण्यामागील कारण काय, त्याचा जीवनच्या प्रकृतीशी काही संबंध होता का आणि विद्यालयातील परिस्थिती नेमकी काय होती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या माहितीची अधिकृत पुष्टी झालेली नाही. फुरळ येणे आणि जीवनचा मृत्यू यांच्यात काही संबंध आहे का, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जीवनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, शाळेत सोडल्यानंतर त्याच्यासोबत काय घडले आणि त्याची प्रकृती अचानक कशी खालावली, याबाबत संभ्रम कायम आहे. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे विद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासाअंतीच जीवनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




Petrol Price




