आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून दुर्धर आजारग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत

- रुग्णसेवा हीच खरी पुण्यसेवा या भावनेतून संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा; काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मदतीचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : समाजातील गरजू, निराधार आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या कुटुंबांच्या अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्याच्या उद्देशाने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही येथील तीन कुटुंबांना सहकार्य करण्यात आले. वसा जनसेवेचा रुग्णसेवा हीच खरी पुण्यसेवा! या मानवतावादी विचारातून शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ मधील रहिवासी सुनीता नैताम या कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याच प्रभागातील आशा पुसतोडे यांनाही कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. तसेच प्रभाग क्रमांक १६ मधील देविका ठाकरे या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्यासमोर आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या तिन्ही कुटुंबांच्या परिस्थितीची दखल घेत आमदार विजय वडेट्टीवार (गटनेते, महाराष्ट्र विधानसभा) यांनी पुढाकार घेऊन त्यांना आवश्यक आर्थिक सहकार्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या वतीने शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनीलभाऊ उट्टलवार, सहकार नेते मधुकर बोरकर, उपाध्यक्षा पूजाताई रामटेके, नगरसेवक पंकज नन्नेवार, नगरसेवक युनुसभाई शेख आणि संचालिका जयश्री नागापुरे यांच्या हस्ते संबंधित कुटुंबांना मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी मृणाल (गोलू) मस्के, अंबादास नैताम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
दुर्धर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना औषधोपचारांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, मानसिक आधार आणि सामाजिक पाठबळाचीही गरज असते. अशा कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केलेले सहकार्य संबंधित कुटुंबांसाठी दिलासादायक ठरते. संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे, हाच खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.




Petrol Price




