आई-वडील चर्चला गेले असताना १४ वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या : परिसरात हळहळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : येथील नागेपल्ली परिसरातील एका १४ वर्षीय मुलाने घरी कोणीही नसताना गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आनोश राजेश टोप्पो १४ वर्ष रा. नागेपल्ली असे मृत मुलाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे अहेरी व नागेपल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील -
मिळालेल्या माहितीनुसार, आनोश हा इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी त्याचे आई-वडील प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते, त्यामुळे आनोश घरी एकटाच होता. याच दरम्यान, सकाळी सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी गळफास लावून घेतला. काही वेळाने पालक चर्चमधून घरी परतले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. आपल्या पोटच्या गोळ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून पालकांनी एकच हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आनोशने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पुढील कार्यवाही आणि तपास -
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, जिथे डॉक्टरांकडून शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले. एका होतकरू मुलाच्या अशा अचानक जाण्याने टोप्पो कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




Petrol Price




