कोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
कोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने  इसमास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने काल १८ सप्टेंबर रोजी ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रामचंद्रम दुर्गम रा. लंबडपल्ली ता. सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे. 
 सिरोंचा तालुक्यातील लंबडपल्ली येथील रामचंद्रम अंकलू दुर्गम व श्रीनिवास बापू दुर्गम हे नातेवाईक असून, शेजारी राहतात. मात्र, रामचंद्रम दुर्गम हा आपल्या कोंबड्या चोरुन खातो, असा संशय श्रीनिवास दुर्गम यास होता. या कारणावरुन दोघांमध्ये भांडण झाले होते. ६ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता श्रीनिवास हा पानठेल्यातून घराकडे परत येत असताना रामचंद्रम दुर्गम याने मागून श्रीनिवासवर कुऱ्हाडीने वार केला. यात श्रीनिवास गंभीर जखमी झाला. यावेळी वार चुकविण्यासाठी श्रीनिवासने हात पुढे केला असता हातालाही गंभीर दुखापत झाली. आरडाओरड केल्यानंतर आरोपी रामचंद्रम दुर्गम हा घटनास्थळावरुन पसार झाला. त्याला सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. बयाण नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपी रामचंद्रम दुर्गम याच्यावर भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक संतोष महादेव कसबे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.  याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी रामचंद्रम दुर्गम या ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.  सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-19


Related Photos