बल्लारपुरात २६ नोव्हेंबरला भव्य संविधान दिन उत्सव : जागर समतेचा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधानाच्या स्वीकार दिनानिमित्त बल्लारपूर येथे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान उत्सव समिती व मित्र परिवाराच्या वतीने भव्य संविधान दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यानगर वॉर्डातील पाली बौद्ध विहारासमोरील भव्य पटांगणावर सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणे तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित राहतील. प्रमुख वक्ते म्हणून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप चौधरी, मास मूव्हमेंटचे अध्यक्ष ॲड. फरहत बेग, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण येरमे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ व कॅन्सर विशेषज्ञ डॉ. शरयू पाझारे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत, तहसीलदार रेणुका कोकाटे, पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन मेश्राम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजोग मेंढे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच बल्लारपूर क्षेत्रातील सर्व धर्मीय धर्मगुरू आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमात नगराध्यक्षा डॉ.अल्का वाढई, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पवन भगत, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते विनोद (सिक्की) यादव आणि माजी उपाध्यक्ष डॉ. सुनील कुल्दीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता उद्घाटन, ६.१५ वाजता पाहुण्यांचे स्वागत, ६.३० वाजता सत्कार समारंभ आणि ७ वाजता प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होईल. रात्री ८ वाजता ‘जागर समतेचा’ हा काव्य, नाट्य आणि संगीतमय आंबेडकरी शाहिरी जलसा सादर केला जाणार आहे. मुंबई येथील धम्मरक्षित रणदिवे संघाच्या वतीने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या संविधान दिन उत्सवाला बल्लारपूर शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक राजू झोडे, संतोष बेताल, ॲड. मेघा भाले, कल्पना कोडापे, चेतन गेडाम, असलम शेख, विवेक खुटेमाटे, सचिन मेश्राम, जितेंद्र करमनकर, नागेश रत्नपारखी, गणपत इटनकर, संजय झिल्लेवार, बंडू फुलझले, देवा करमनकर, विश्वास देशभ्रतार सह आदीने केले आहे.




Petrol Price




