महत्वाच्या बातम्या

 पहिल्यांदाच RTO चे अधिकारी रस्ता सुरक्षा मार्गदर्शनासाठी पोहोचले जिल्हा परिषद शाळा, एटापल्ली येथे!


- सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, एटापल्ली येथे प्रथमच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे हा उद्देश होता.

माननीय किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय राहुल कदम (सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी ) आणि माननीय  अशोक जाधव (सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी ) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी स्वप्निल वानखेडे, मोटार वाहन निरीक्षक, देवेंद्र पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि जगदीश गजपुरे (वाहन चालक)उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा व सीटबेल्टचा वापर, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता वाढविण्यास मदत होणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांविषयी जबाबदारीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वतः सुरक्षित राहून इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अशा जनजागृती उपक्रमांमुळे सुरक्षित वाहतूक संस्कृती निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागेल. वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा आणि सुरक्षित जीवन जगा!





  Print






Related Photos