महत्वाच्या बातम्या

 भुसेवाडा बेली ब्रीजचे काम अनेक वर्षांपासून रखडले : CPI सोबत ग्रामस्थांचा आंदोलनाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत मल्लमपोडूर अंतर्गत भुसेवाडा गावाला जोडणाऱ्या मंजूर बेली ब्रीजचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाअभावी नागरिकांच्या सुरक्षित दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला असून, हे काम तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) सोबत झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.

पावसाळ्यात नदीला पूर आल्यास नागरिकांना ये-जा करणे धोकादायक ठरते. अनेकदा गावाचा इतर भागांशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे येतात, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे कठीण होते, तर बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे कठीण होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व इतर वाहनांच्या वाहतुकीतही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अनेक वर्षांपासून मंजूर बेली ब्रीजचे काम अपूर्ण राहणे ही गंभीर बाब आहे. हे काम नेमके कोणत्या कारणामुळे थांबले आहे, कामात कोणते प्रशासकीय, तांत्रिक किंवा आर्थिक अडथळे आहेत, याची संबंधित विभागाने स्पष्ट माहिती द्यावी. काम रखडण्याची वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडून सर्व अडथळे तातडीने दूर करावेत आणि बांधकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी CPI ने केली आहे.

गावात बैठक; आंदोलनाचा निर्णय -
भुसेवाडा गावात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बेली ब्रीजचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, पावसाळ्यात निर्माण होणारा धोका आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाने कामातील अडथळे दूर करून बांधकाम तातडीने सुरू करावे. अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

CPI ने बेली ब्रीजचे काम थांबण्यामागील कारणांची सखोल चौकशी करून लेखी अहवाल द्यावा, मंजूर निधी व खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच रखडलेले काम तातडीने सुरू करून निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या आहेत. काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षित दळणवळणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

भुसेवाडा परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पुलाच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मंजूर बेली ब्रीजचे काम नेमके कोणत्या कारणामुळे थांबले आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. कामातील सर्व अडथळे दूर करून बांधकाम तातडीने सुरू करावे. अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.

यावेळी CPI चे जिल्हा सदस्य कॉ. सूरज जक्कुलवार आणि भुसेवाडा येथील नागरिकांनीही बेली ब्रीजचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.





  Print






Related Photos