महत्वाच्या बातम्या

 सहा वर्षांपासून रखडलेल्या NH-353C वर पुन्हा वाहतूक कोंडी : मोसम गावाजवळ दोन तास वाहतूक ठप्प!


- वशिष्ठ कन्स्ट्रक्शनच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह; काम रद्द करून नव्याने निविदा काढल्यानंतर त्याच कंत्राटदाराला मुदतवाढ कशी? संतोष ताटीकोंडावार यांचा सवाल; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वशिष्ठ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कथित निष्काळजी कारभारामुळे मोसम गावाजवळ महामार्गावर अवजड वाहन अडकल्याने सुमारे दोन तासांपासून वाहतूक ठप्प झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सहा वर्षांपासून महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नसताना वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निर्णयप्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे, महामार्गाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण न केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती असतानाही पुन्हा त्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आल्याचा आरोप होत आहे. जर संबंधित कंत्राटदाराचे काम रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आली होती, तर पुन्हा त्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यामागील नेमके कारण काय? काम रद्द करण्याचे आदेश, नव्या निविदेची प्रक्रिया आणि मुदतवाढ देण्याचे निर्णय यामध्ये नेमका काय संबंध आहे, हे राष्ट्रीय महामार्ग विभागाने जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या या कथित विरोधाभासी निर्णयांमुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेची दिशाभूल करून संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घातले जात आहे का? या प्रक्रियेत अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत आहे का? या सर्व बाबींची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करताना अडथळे निर्माण होत असून, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. गंभीर आजारांच्या रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेण्यातही अडचणी येण्याची शक्यता आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वारंवार निर्माण होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक नुकसानही होत आहे.

सहा वर्षांपासून महामार्गाचे काम रखडलेले असताना आणि वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही संबंधित विभागाकडून प्रभावी उपाययोजना का केल्या जात नाहीत? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ताटीकोंडावार यांनी उपस्थित केला आहे.

निविदा, निधी आणि कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा -
या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकता स्पष्ट करण्यासाठी मूळ निविदा प्रक्रिया, कंत्राट रद्द करण्याचे आदेश, नव्याने काढण्यात आलेल्या निविदेची कागदपत्रे, त्याच कंत्राटदाराला दिलेल्या कथित मुदतवाढीचे आदेश, कामाची प्रत्यक्ष प्रगती, गुणवत्ता तपासणी अहवाल आणि आतापर्यंत अदा करण्यात आलेल्या निधीची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संगनमत, आर्थिक गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

तातडीने वाहतूक सुरळीत करून काम पूर्ण करा -
मोसम गावाजवळ निर्माण झालेली वाहतूक कोंडी तातडीने दूर करून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य रस्त्याची व्यवस्था करावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीचे उर्वरित बांधकाम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागाने स्वीकारावी, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रकरणात पारदर्शक भूमिका घेऊन प्रत्येक निर्णयाचा खुलासा करावा. जनतेच्या करातून खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीबाबत उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे. अन्यथा नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी दिला आहे.





  Print






Related Photos