भगवान बिरसामुंडा यांच्या विचारांतून आदिवासी अस्मितेचा जागर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अन्याय, शोषण आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्षाची मशाल पेटविणारे धरती आबा भगवान बिरसामुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राजुरा येथील भगवान बिरसामुंडा चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी भगवान बिरसामुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भगवान बिरसामुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी दिलेला लढा हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारा आहे. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष आणि समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटविण्याचे कार्य आजही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.
त्यांचे क्रांतिकारी विचार, त्याग आणि संघर्षाची परंपरा आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असून नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक एकता, स्वाभिमान आणि हक्कांसाठी जागरूक राहणे आवश्यक आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




