सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर


- आरोग्यमंत्र्यांचा खाजगी डॉक्टरांशी संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवितांना शासकीय आरोग्य यंत्रणेसोबतच खाजगी डॉक्टरांची देखील महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे रुग्णसेवेसाठी खाजगी डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेसोबत एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. खाजगी डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. इंझापूर येथील रायजादा टाऊन येथे आयएमए व निमा संघटनेच्यावतीने खाजगी डॉक्टरांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार अमर काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रदिप सुने, निमाचे डॉ.वंजारी, आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.
समाजामध्ये असलेली डॉक्टरांची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना आपुलकीच्या भावनेने उपचार करावे. आता राज्यातील आरोग्यसेवेत मोठी सुधारणा करण्यात आली असून आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवून महाराष्ट्र मेडीकल टूरिझम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी डॉक्टर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असून खाजगी रुग्णालय नोंदणी, नोंदणी नुतणीकरण कालावधी, नोंदणी शुल्क कमी करणे आदीवरही विचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. खासदार अमर काळे यांनी वर्धा येथील १०० खाटांचे महिला रुग्णालय तत्काळ सुरु करणे तसेच वर्धा व हिंगणघाट येथील बंद असलेले डायलिसिस सेंटर पुर्ववत सुरु करावे, अशी मागणी केली. तसेच जिल्ह्यातील रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात होणारे रुग्णांचे रेफरल बंद करावे, अशीही मागणी यावेळी केली.
यावेळी आयएमए, निमाच्यावतीने राज्य व जिल्हास्तरावरील नियामक समितीवर खाजगी डॉक्टरांची सदस्य म्हणुन नियुक्ती करावी, नोंदणी प्रणालीसाठी एक खिडकी योजना असावी, नोंदणी शुल्क कमी करावे, नुतणीकरणाचा कालावधी वाढवावा, बायोमेडिकल कचरा विलगीकरणाची सुविधा स्थानिक स्तरावर निर्माण करुन द्यावी. बोग डॉक्टरांवर आळा बसावा, असे विषय आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर मांडले. आयएमए, निमा संघटनेचे सदस्य तसेच सेवाग्राम येथील रुग्णालयाचे डॉक्टर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सेलू नगर पंचायतीला सदिच्छा भेट -
आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संवाद यात्रेनिमित्त सेलू दौऱ्यावर असतांना सेलू नगर पंचायतीला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, मुख्याधिकारी अनुपकुमार अग्रवाल, राजेश सराफ आदी उपस्थित होते. यावेळी श्री.आबिटकर यांच्याहस्ते सेलू नगर पंचायतीच्यावतीने कचरा व्यवस्थापन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैविक खताचे शेतकऱ्यांना तर सफाई कर्मचाऱ्यांना सफाई किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला सेलू नगर पंचायतीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.




Petrol Price




