शेतात सापडले दुर्मिळ कासव : माणुसकी जिंकली, वनविभागाने दिले निसर्गाच्या कुशीत जीवन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतात अचानक आढळलेल्या दुर्मिळ इंडियन स्टार टॉर्टाइजच्या जीवाला धोका निर्माण होण्यापूर्वीच एका शेतकरी कुटुंबाच्या जागरूकतेमुळे त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीत परतण्याची संधी मिळाली. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी नाल्यालगतच्या शेतात अनिल फरकडे यांना हे दुर्मिळ कासव आढळले. त्यांनी त्याला स्वतःकडे न ठेवता तातडीने त्यांचे बंधू तथा कोठारीचे उपसरपंच सुनील फरकडे यांना माहिती दिली.
सुनील फरकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनरक्षक यू. ए. घोळवे, हरणपायलीचे वनरक्षक पी. व्ही. कावळे, वनसेवक बंडू आत्राम आणि रुपेश महेशकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कासवाला सुरक्षितपणे ताब्यात घेत त्याची पाहणी केली. पाहणीत ते दुर्मिळ इंडियन स्टार टॉर्टाइज असल्याचे स्पष्ट झाले.
आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी या दुर्मिळ जीवाला पुन्हा जंगलातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त केले. काही काळ शेतात हरवलेल्या या जीवाला पुन्हा आपल्या नैसर्गिक जगात परतता आले.
कवचावर ताऱ्याप्रमाणे आकर्षक नक्षी असलेले इंडियन स्टार टॉर्टाइज हे भारतातील वैशिष्ट्यपूर्ण कासवांपैकी एक आहे. वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी आणि संकलन होत असल्याने या प्रजातीच्या संरक्षणाला विशेष महत्त्व आहे.
दुर्मिळ वन्यजीव दिसला की त्याला घरात ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो; मात्र फरकडे कुटुंबीयांनी मोहाला बळी न पडता वनविभागाला माहिती देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेमुळे एका निष्पाप जीवाला सुरक्षितपणे पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाता आले. या जागरूकतेचे वन्यजीवप्रेमींकडून कौतुक होत आहे.




Petrol Price




