महत्वाच्या बातम्या

 निवडणुकीच्या दिवशी शहरी भागातील आठवडी बाजार बंद राहणार


- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश; बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राहावी, यासाठी निवडणुकीच्या दिवशी शहरी भागात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी यांनी बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ च्या कलम ५ (अ) अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी शहरी भागात नियमितपणे भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ राहण्याची शक्यता लक्षात घेता, मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, हा या आदेशामागील प्रमुख उद्देश आहे.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात येणारे आठवडी बाजार इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित बाजार समित्या, विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी या आदेशाची नोंद घेऊन त्यानुसार नियोजन करावे.निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.





  Print






Related Photos