CPI, AIYF आणि AISF च्या मागणीला यश : कोसा आलेंगा येथील बंद शाळा पुन्हा सुरू!


- जिल्हा परिषद शाळा बंद होत असताना अनेक वर्षांपासून बंद असलेली शाळा पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांना आता गावातच शिक्षण मिळणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : आजच्या काळात जिल्हा परिषद शाळा बंद होत असताना, ग्रामपंचायत कोहका अंतर्गत येणाऱ्या कोसा आलेंगा गावातील अनेक वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) यांनी शिक्षक उपलब्ध करून शाळा सुरू करण्यासाठी केलेल्या मागणीला यश आले आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जाण्याची वेळ टळणार आहे.
कोसा आलेंगा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत उपलब्ध असतानाही शिक्षक नसल्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज बंद होते. परिणामी, गावातील अंदाजे तीन लहान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोहका येथील जिल्हा परिषद शाळेत जावे लागत होते. त्यासाठी त्यांना दररोज सुमारे २ ते ३ किलोमीटर जंगलातील पायवाटेने पायी प्रवास करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत होता.
गावातील नागरिकांनी ही समस्या CPIच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन देऊन तात्काळ शिक्षक उपलब्ध करून शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नासाठी CPI, AIYF आणि AISF यांनी पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून शाळा पुन्हा सुरू केल्याने गावकऱ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.
शाळा बंद पडत असताना बंद शाळा सुरू करणे ही जनआंदोलनाची ताकद आहे! -
याबाबत CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, कोसा आलेंगा येथे शाळेची इमारत आणि विद्यार्थी उपलब्ध असतानाही केवळ शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद होती. लहान विद्यार्थ्यांना दररोज जंगलातील पायवाटेने दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागत होते. गावकऱ्यांनी ही समस्या आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर CPI, AIYF आणि AISF यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे हा प्रश्न ठामपणे मांडला. आमच्या मागणीला यश आले असून शाळा पुन्हा सुरू झाली आहे. हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा आणि जनआंदोलनाच्या ताकदीचा विजय आहे.
ते पुढे म्हणाले, आज एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असताना दुर्गम आणि आदिवासी भागातील बंद शाळा पुन्हा सुरू होणे ही महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक गावातील मुलांना त्यांच्या गावातच प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणासाठी लहान मुलांना जंगलातील पायवाटेने दुसऱ्या गावात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक शिक्षक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
कोसा आलेंगा येथील शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या CPI, AIYF आणि AISF यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही, तसेच शाळा आणि शिक्षकांच्या अभावामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी CPI, AIYF आणि AISF यांचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका कॉ. सचिन मोतकुरवार यांनी व्यक्त केली.




Petrol Price




