वन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती


- विविध झाॅकी आणि आदिवासी नृत्याने वेधले नागरिकांचे लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
१ ते ७ आॅक्टोबरपर्यंत राबविल्या जात असलेल्या वन्यजीव सप्ताहास आज १ ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला. वन्यजीव सप्ताहानिमित्त गडचिरोली वनविभागाच्या वतीने शहरात विविध झाॅकी आणि आदिवासी नृत्यांचा सहभाग असलेली भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते करण्यात आली. रॅलीत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखावा सादर केला होता. विविध वन्यजीवांची वेशभुषा धारण केलेले विद्यार्थी वन्यजीव रक्षणाचा संदेश देत होते. तसेच गोंडवाना सैनिकी विद्यालयातील अश्वसुध्दा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले. रॅलीमध्ये वाघ, सिंह, अस्वल, ससा, हरीण, शिकारी अशा वेशभुषा धारण केलेले कलाकार सहभागी झाले होते. गिधाड उपहारगृह व कार्यालयाची झाॅकी तयार करण्यात आली होती. रॅली शहरातील चारही मुख्य मार्गांनी मार्गक्रमण केल्यानंतर धानोरा मार्गावरील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात पोहचली. या  ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. कार्यक्रमाला मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डब्ल्यू. आय. यटबाॅन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष उध्दव डांगे, मानद वन्यजीव रक्षक मिलींद उमरे, सहाय्यक वनसरंक्षक सोनल भडके, वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमात खा. अशोक नेते, मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक यटबाॅन तसेच मान्यवरांनी वन्यजीव रक्षणाबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, हे पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले. संचालन वनरक्षक सुनिल पेंदोरकर यांनी केले तर आभार सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी मानले. यावेळी नागरिक, सर्पमित्र, गिधाडमित्र, वनरक्षक, वनकर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-01


Related Photos