भरधाव हार्वेस्टरची दुचाकीला मागून धडक : ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू


- चांगोटोला येथील घटना; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सेवकराम येळे यांचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सपरीस
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे हार्वेस्टर चालवून दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांगोटोला येथे गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. सेवकराम मालीकराम येळे (६२, रा. चांगोटोला) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेवकराम येळे हे गुरुवारी सकाळी दुचाकीने जात होते. याचदरम्यान हार्वेस्टर क्रमांक टीजी १६-सी ५६९९ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून येळे यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे चांगोटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवजड वाहनांच्या निष्काळजी वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी दिलीप सेवकराम येळे (३४, रा. चांगोटोला) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित हार्वेस्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.




Petrol Price




