महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर टप्प्याटप्प्याने तोडगा काढण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन


- गडचिरोलीत विविध शिक्षक संघटनांची एकत्रित बैठक; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक व आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा गडचिरोली तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज शिक्षण विभाग, प्राथमिक, जिल्हा परिषद गडचिरोली येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

शिक्षण विभागाच्या दालनात झालेल्या या बैठकीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रेरक प्रकाश उजागरे यांच्या उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी सर्व संघटनांच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शिक्षकांच्या सेवाविषयक तसेच आर्थिक प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिक्षकांच्या अनेक समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्यामध्ये सेवाविषयक बाबी, आर्थिक प्रश्न तसेच प्रशासनाशी संबंधित विविध विषयांचा समावेश असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करताना संबंधित प्रकरणांचा प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून शिक्षकांच्या प्रलंबित समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे यांनी यावेळी दिले.

शिक्षणाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत -
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सर्व शिक्षक संघटनांना एकत्रितपणे बैठकीस पाचारण करून चर्चा घडवून आणल्याबद्दल विविध शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजागरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या प्रश्नांवर सर्व संघटनांना सोबत घेऊन चर्चा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

धनंजय दुमपेटीवार यांचा सन्मान -
दरम्यान, जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागात सलग पाच वर्षे सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत राहून प्रशासनाची धुरा उत्तम पद्धतीने सांभाळणारे धनंजय दुमपेटीवार यांचे गडचिरोली पंचायत समितीत स्थानांतरण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली तसेच विविध शिक्षक संघटनांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी दुमपेटीवार यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल उपस्थित शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गौरवोद्गार काढले.

विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित -
या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रॉयसिडाम, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, चामोर्शी तालुका शिक्षक संघाचे युवा आघाडी अध्यक्ष जगदिश कळाम, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष मोरेश्वर भैसारे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस डॉ. दिवाकर नारनवरे, माणिक रामटेके, महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप मेश्राम, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष गौतम लांडगे उपस्थित होते.

तसेच सेवानिवृत्त संघटनेचे प्रमुख पदाधिकारी अनिल मुलकलवार, विजय बनसोड, कोमेरवार, दुष्यंत तुरे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, शिक्षक परिषदेचे प्रमुख राज्य पदाधिकारी अविनाश तालापलीवार, विजय साळवे, जिल्हा प्रमुख कुणाल कोवे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रमुख पदाधिकारी बापू मुनघाटे, गुरुदेव नवघडे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे, सरचिटणीस खिरेंद्र बांबोळे, डंबाजी पेंदाम, साईनाथ अलोने आदी उपस्थित होते.

दिव्यांग संघटनेचे प्रमुख पदाधिकारी राजेंद्र गंडाटे, विषय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संजय लोणारे, मंगेश गद्देवार, राजकुमार घोडेस्वार, देवेंद्र डोहणे,आशिष धात्रक, विनोद ब्रामनवाडे, चुडामण उंदीरवाडे, प्रभाकर गडपायले, कृपाराम खोब्रागडे, राकेश सोनटक्के, तसेच बांगला शिक्षक संघटनेचे हरेन सिकदर,संजित सरकार, संमेलन सरकार, गांगुली यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक वातावरण -
विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. प्रशासन आणि शिक्षक संघटनांमध्ये समन्वयातून प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.





  Print






Related Photos