महत्वाच्या बातम्या

 मुलमध्ये सट्टापट्टीवर पोलिसांची धडक कारवाई : तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध कल्याण बाजार सट्टापट्टीचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत सट्टापट्टी खेळविणाऱ्या तिघांकडून एकूण १ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत डोंगरगाव येथील संदिप अर्जुन लेनगुरे (४०), पंचशील वार्ड मुल येथील प्रदीप बाबुराव आकेवार (५८) आणि वार्ड क्रमांक १५ मधील सरकारी दवाखान्याजवळील रुपचंद यशवंत बांबोळे (५२) यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. संदिप लेनगुरे याच्याकडून ५५० रुपये रोख, सट्टापट्टीची चिठ्ठी व पेन असा ५५५ रुपयांचा मुद्देमाल, प्रदीप आकेवार याच्याकडून ६५० रुपये रोख, चिठ्ठी व पेन असा ६५५ रुपयांचा, तर रुपचंद बांबोळे याच्याकडून ६९० रुपये रोख, चिठ्ठी व पेन असा ६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

डोंगरगाव येथील नियती जनरल स्टोअर्स, मुल येथील चिरोली ऑटो स्टँड आणि तहसील कार्यालय परिसरात हे तिघेही नागरिकांकडून पैसे घेऊन कल्याण बाजार सट्टापट्टीचे आकडे चिठ्ठ्यांवर लिहून हार-जीतचा जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच परिसरातील काही जणांनी पळ काढला. मात्र, सट्टापट्टी चालविणाऱ्या तिघांना पकडून त्यांच्याकडील रोख रक्कम, चिठ्ठ्या व पेन जप्त करण्यात आले. सदर कारवाई मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस अंमलदार शंकर बोरसरे यांनी केले. मुल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.





  Print






Related Photos