महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय बालक व विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यातील एकूण १७ बालक/विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. सदर बालक व विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत शालेय आरोग्य तपासणीदरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), गडचिरोली येथे आवश्यक नेत्र तपासणी व निदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

विद्यार्थ्यांना वेळेवर आवश्यक दृष्टी तपासणी व चष्मे उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस तसेच दैनंदिन जीवनातील दृष्टीसंबंधित अडचणी दूर करण्यास मदत होणार आहे. सदर कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली; अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली; DEIC-RBSK अधिकारी व कर्मचारी; महात्मे आय हॉस्पिटल, नागपूरचे वैद्यकीय पथक, तसेच संबंधित विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय बालकांमध्ये आढळणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची वेळेवर ओळख, आवश्यक तपासणी, संदर्भ सेवा व उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.





  Print






Related Photos