राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी व्हा : आ.डाॅ. देवराव होळी


- ३० जानेवारीपर्यंत राबविणार विविध उपक्रम
पत्रकार परिषदेतून दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उद्या २ आॅक्टोबरपासून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३० जानेवारी २०१९ पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत तसेच स्वच्छता उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
पुढे बोलताना आ.डाॅ. होळी म्हणाले, गांधीजींनी पाहिलेल्या नवभारताचे स्वप्न भाजपा सरकारने पूर्ण केले आहे. गांधींनीना वाटत होते की, सर्वांसाठी शौचालये नसतील तर स्वराज्याला अर्थ नाही. अस्वच्छतेविरोधातील लढ्याला त्यांनी महत्व दिले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वांसाठी शौचालयांची निर्मिती केली. महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला. स्वदेशी हा गांधीजींच्या जिव्हाळ्याचा विषय होता. देशी उत्पादनांना प्राधान्य दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन गडचिरोली हा उपक्रम चालु केला. विविध क्षेत्रात देशी उत्पादन वाढत आहे. गांधीजींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. शेतीसाठी पाणी, प्रत्येक गावाला वीज, पक्के रस्ते, गतिमान इंटरनेट, आरोग्य सेवा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. ही सर्व कामे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून गावा - गावात पोहचविली जाणार आहेत. लोकसभा क्षेत्र आणि सर्व विधानसभा क्षेत्रात ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
पदयात्रेचा शुभारंभ उद्या गडचिरोली येथून सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकात होणार आहे. यानंतर उद्या २ आॅक्टोबर रोजी संपूर्ण गडचिरोली शहरात १० बुथवर ही यात्रा पोहचणार आहे. ३० जानेवारीपर्यंत संपूर्ण विधानसभा क्षेत्रात पदयात्रेदरम्यान स्वच्छता अभियान तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आ.डाॅ. होळी यांनी दिली.
पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी.के. मेश्राम, तालुकाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2018-10-01