विवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या


वृत्तसंस्था / चेन्नई :   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विवाहबाह्य संबंध आता गुन्हा राहिलेला नाही. त्यामुळे तू मला विवाहबाह्य संबंध ठेवण्यापासून रोखू शकत नाही असे पतीने सुनावल्यामुळे हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तामिळनाडूत चेन्नईमध्ये एमजीआर नगर येथे शनिवारी घडली. 
पुष्पलता (२४) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिने व्यभिचाराचा मुद्दा आत्महत्येमागचे एक कारण असल्याचे म्हटले आहे. जॉन पॉल फ्रँकलिन (२७) असे आरोपीचे नाव असून तो सुरक्षा रक्षकाची नोकरी करतो. शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.  
पुष्पलताला क्षयरोग झाल्यानंतर जॉन तिच्यापासून दूर राहू लागला. महिलेचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर तो तिला घर चालवायलाही पैसे देत नव्हता अशी माहिती मिळाली. पुष्पलताने तिच्या मनातील भावना जॉनच्या एका मित्राजवळ मोकळया केल्यानंतर त्याने जॉनचे दुसऱ्या एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे सांगितले.  जॉन बऱ्याचदा घरी उशिरा यायचा किंवा घरापासून लांब रहायचा. अलीकडेच पुष्पलताने त्याला बाहेर सुरु असलेल्या त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल जाब विचारला होता व त्या महिलेपासून दूर रहा अन्यथा पोलिसात तक्रार दाखल करु अशी धमकी दिली होती. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास पुष्पलताने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  Print


News - World | Posted : 2018-10-01


Related Photos