उस्मानाबाद : जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस
वृत्तसंस्था / उस्मानाबाद :
पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी एक संतापजनक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. उस्मानाबाद शहरातील काका नगर भागात राहणाऱ्या एका दाम्पत्याला जातपंचायतीने अमानुष वागणूक दिली आहे. जातपंचायतीकडून गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून संबंधित दाम्पत्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी मध्यरात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
सोमनाथ आणि सुनिता असे पीडित दाम्पत्याचे नाव असून ते उस्मानाबाद शहरातील काका नगर परिसरातील रहिवासी आहेत. आठ वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात पीडित दाम्पत्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण जात पंचायतीकडे गेले असता, जात पंचायतीतील पंचांनी नुकसान भरपाई म्हणून चार एकर शेती आणि 7 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या पैशांसाठी जात पंचायतीतील लोक पीडित दाम्पत्याला सतत त्रास देत होते. परंतु पीडित दाम्पत्याकडे एवढे पैसे नसल्याने ते नुकसान भरपाई देऊ शकत नव्हते. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी वसुली करण्याच्या अनुषंगाने पुन्हा जात पंचायत भरवण्यात आली होती. पीडित दाम्पत्याला त्रास देण्यासाठी पंचांनी संबंधित घटनेला वेगळे वळण दिले. यावेळी सोमनाथ याच्यावर त्याचे स्वत:च्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. याची शिक्षा म्हणून आरोपींनी सोमनाथ यांना मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडली.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सोमनाथ यांच्या पत्नी सुनिता यांना नग्न करून त्यांना जबरी मारहाण केली. समाजासमोर झालेला हा अपमान जिव्हारी लागल्याने पीडित दाम्पत्य सोमनाथ आणि सुनिता यांनी 24 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. नातेवाईकांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, याठिकाणी सुनिता यांचा प्राण वाचला पण सोमनाथ यांचा उपचारादरम्यान 5 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी सुनिता यांच्याकडे चौकशी केली असता, सुनिता यांनी जात पंचायतीच्या पापांचा पाढाच वाचला आहे. बुधवारी रात्री उशीरा आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-08
Related Photos