देसाईगंजमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड : १०३ किलो गोमांसासह एकास अटक


- दोघे पसार; जिवंत गोवंशासह ६१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : शहरातील किदवाई वार्ड परिसरात बंदिस्त वॉलकंपाऊंडमधील शेडमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली, तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळावरून १०३ किलो गोमांस, दोन जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे देसाईगंज शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, किदवाई वार्डातील सिमेंट पिलर असलेल्या बंदिस्त वॉलकंपाऊंडमधील एका शेडमध्ये मोनिश उर्फ मिनीश शेख अब्दुल कदीर शेख २७ वर्ष, रा. कमलानगर, देसाईगंज) हा गोवंशाची कत्तल करीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी रात्री संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची धाड पडताच घटनास्थळी असलेल्यांमध्ये धावपळ उडाली. यावेळी पोलिसांनी मोनिश उर्फ मिनीश शेख याला ताब्यात घेतले, तर अन्य दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.
१०३ किलो गोमांसासह विविध साहित्य जप्त -
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे १०३ किलो गोमांस, एक इलेक्ट्रिक वजनकाटा, लोखंडी सरसे आणि दोन जिवंत गोवंश आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून त्याची एकूण किंमत ६१ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.ताब्यात घेतलेल्या मोनिश उर्फ मिनीश शेख याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शमरोझ पठाण याचा असल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोनिश शेख याच्यासह शमरोझ पठाण आणि त्याचा साथीदार तुषार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय न्याय संहितेसह विविध कायद्यांन्वये गुन्हा -
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाच्या कलम ५ (स) व ९ (अ), तसेच प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पसार झालेल्या दोघांचा शोध घेण्यासह या कथित कत्तलखान्यात नेमके कोण कोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.
गैरप्रकार किती दिवसांपासून सुरू होता? पोलिसांकडून तपास -
संबंधित ठिकाणी गोवंश कत्तलीचा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, या ठिकाणी आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच गोमांसाची विक्री कुठे आणि कोणाला केली जात होती, याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. शहरातील रहिवासी भागात अशा प्रकारे कथित अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय गिते, हवालदार शेखलाल मडावी, पोलीस अंमलदार शैलेश तोरपकवार, नीतेश कढव तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. लोकनाथ नागदेवते यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम साबळे करीत आहेत. दरम्यान, शहरातील अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कारवायांमध्ये सातत्य राखले जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




