संतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप


- जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उघडले कुलूप, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पोर्ला :
गरोदर मातेला प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचारासाठी दाखल करण्यासाठी आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकाला प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद असल्याचे दिसताच संतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शशिकांत शंभरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून ग्रामस्थांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरपंचा कविता फरांडे यांच्या सुचनेनुसार कुलूप उघडण्यात आले आहे.
आज २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गरोदर माता प्रिया सुरज गेडाम हिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी पती सुरज गेडाम हा घेवून गेला. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद असल्याने तो पायरीवर बसून राहिला. याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून कुलूप लावले. याची माहिती सरपंचा कविता फरांडे, उपसरपंच नरेंद्र मामीडवार, सदस्य रविंद्र सेलोटे, होमराज उपासे, रेखा डवरे, पुष्पा भोयर, कविता चुधरी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शालिक भोयर यांना देण्यात आली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्याशी संपर्क साधला. आरोग्य अधिकारी शंभरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच यानंतर आवश्यक आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच तत्काळ वैद्यकीय अधिकारी मनोज बिटपल्लीवार, आरोग्य सेविका सहारे यांना रात्रपाळीसाठी नियुक्त केले.
यानंतरही ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून कुलूप उघडण्यास ग्रामस्थांना राजी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक रमेश फरांडे, तुलाराम डवरे, पांडुरंग भोयर, किमदेव उपासे, अमित उपासे, दिलीप शिवनकर, अशोक बोहरे, लोमेश कलसार, पुनित उपासे, सोमेश्वर अम्मावार, महेश राउत, मनोज गेडाम, अनिल गेडाम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-24


Related Photos