महत्वाच्या बातम्या

 धानोरा तालुक्यात दोन भीषण अपघात : एकाचा मृत्यू, तर दुसरा तरुण गंभीर जखमी




- कुलभट्टी येथे ट्रकच्या धडकेत २३ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू; जपतलाईजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : धानोरा तालुक्यात ६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत एका २३ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुलभट्टी येथे ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू -
पहिली घटना धानोरा तालुक्यातील कुलभट्टी येथे घडली. मनोज तुळशीराम कोरेटी २३ वर्षे रा. कुलभट्टी, ता. धानोरा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मनोज हा मालेवाडा येथे बी.ए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त तो आपल्या गावी आला होता. ६ नोव्हेंबर रोजी तो आपल्या दुचाकीने घरून छत्तीसगड राज्यातील कांदाडी येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, धानोरा येथून छत्तीसगडच्या दिशेने जाणाऱ्या एपी ०७ टीजे-२१७१ क्रमांकाच्या ट्रकने कुलभट्टी गावाजवळील मुख्य मार्गावर त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की मनोज हा दुचाकीसह सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

जपतलाईजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर -
दुसरी घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या दरम्यान धानोरा-मुरुमगाव मार्गावरील जपतलाई गावाजवळ घडली. रोहिदास मनोहर बोगा २४ वर्षे रा. मरकेगाव, ता. धानोरा असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहिदास हा आपल्या नातेवाईकाला धानोरा येथून दुचाकीने जपतलाई येथे सोडण्यासाठी गेला होता. नातेवाईकाला सोडल्यानंतर तो एकटाच दुचाकीने परत येत असताना जपतलाईजवळ एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात रोहिदास गंभीर जखमी झाला असून त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच चेहरा आणि डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कुलभट्टी गावावर शोककळा -
दरम्यान, मनोज कोरेटी या तरुण विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच कुलभट्टी गावावर शोककळा पसरली. मनोजच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. एकाच दिवशी धानोरा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





  Print






Related Photos