मुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना


- नागरिकांचा वनविभागावर रोष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
तालुक्यातील मुरपार येथे आईसोबत कचरा टाकण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाला वाघाने ठार केल्याची घटना आज २७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३०  वाजताच्या सुमारास घडली आहे.
साहिल अमोल सालोरकर (०८)  रा. एकारा ता. ब्रम्हपुरी असे वाघाने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे. साहिल सालोरकर हा मुरपार येथे शिक्षणासाठी आला होता. तो आपल्या आजीच्या घरी राहून इयत्ता २ ऱ्या  वर्गात शिक्षण घेत होता. आज पहाटेच्या सुमारास तो आपल्या आईसोबत गावालगत कचरा टाकण्यासाठी गेला. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने साहिलवर झडप घातली. त्याला ओढत जंगलात नेले. त्याच्या नरडीचा घोट घेवून त्याला जागीच गतप्राण केले. आरडाओरड करताच संपूर्ण गाव गोळा झाले. जंगलात त्याचा शोध घेतला असता साहिल मृतावस्थेत आढळून आला. 
मागील दोन ते तीन महिन्यांपासून या वाघाने परिसरात धुमाकूळ घातला आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना वनविभागाचे अधिकारी दूर्लक्ष करीत आहेत. घटना घडल्यापासून वृत्त लिहीपर्यंत अद्याप वनविभागाचा एकही अधिकारी दाखल झाला नव्हता. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 0000-00-00


Related Photos