संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ऑन फील्ड


- ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी; टंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा नियमित व पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांना वेग दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध गावांना आणि नगरपरिषद क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी देत पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली.
पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, विहिरींची पाणीपातळी, जलकुंभ आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव बुजुर्ग व चाकडोह, काटोल पंचायत समितीअंतर्गत गंगालडोह, तसेच कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपंचायत क्षेत्र आणि ताराबोडी व महादुला येथील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बोरगाव बुजुर्गमध्ये कोळसा खाणींमुळे पाणीटंचाईची तीव्रता -
कळमेश्वर परिसरातील बोरगाव बुजुर्ग येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या या गावाच्या परिसरात कोळशाच्या खाणी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवत असल्याची माहिती ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. गावातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी काही भागांमध्ये अद्याप पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे केवळ पायाभूत सुविधा उभारण्यावर न थांबता त्यांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक गाववस्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. गावातील सर्व वस्त्यांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बोरगाव बुजुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीराम धोटे, उपसरपंच निखिल धोटे आणि उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार डहाट उपस्थित होते.
चाकडोहमध्ये नवीन कूपनलिका, विहिरींची दुरुस्ती आणि सौरऊर्जेवर भर -
चाकडोह ग्रामपंचायत क्षेत्रात तीन टोले असून गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ४०० आहे. या भागातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चाकडोहसह परिसरातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीदरम्यान त्यांनी पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी, पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरींची स्थिती आणि जलकुंभांची उपलब्धता याबाबत माहिती घेतली. पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन कूपनलिका खोदणे, अस्तित्वातील विहिरींची आवश्यक दुरुस्ती करणे तसेच वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सौरऊर्जेचा पर्याय वापरण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गंगालडोहमध्ये नवीन विहिरींचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश -
काटोल पंचायत समितीअंतर्गत गट ग्रामपंचायत गंगालडोह येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सुमारे ३५० लोकसंख्या असलेल्या या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे आगामी काळात, विशेषतः डिसेंबरनंतर, गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या परिसरातील भूजलपातळी सुमारे ८०० ते ९०० फूट खोल असल्याने जलस्रोत उपलब्ध करून घेणे हे मोठे आव्हान ठरत आहे. सद्यस्थितीत गावातील काही जलस्रोत आटल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन विहिरींचा आराखडा आणि प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रशासकीय मंजुरी घेऊन विहिरींच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित असलेली कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कळमेश्वर-ब्राह्मणीसाठी ४७ विहिरींचे प्रस्ताव; २५ कामांना प्राधान्य -
कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. या क्षेत्रासाठी एकूण ४७ विहिरींचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी पाणीटंचाईच्या दृष्टीने अधिक गरजेच्या असलेल्या २५ विहिरींची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उर्वरित विहिरींची कामे जानेवारी महिन्यात हाती घेण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ताराबोडी व महादुला येथील पाणीपुरवठा समस्यांचाही आढावा -
जिल्हाधिकाऱ्यांनी ताराबोडी आणि महादुला येथील पाणीपुरवठा व्यवस्थेबाबतही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सध्याच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासोबतच भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.
पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला दक्ष राहण्याचे निर्देश -
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन, विहिरींची दुरुस्ती, नवीन जलस्रोतांची निर्मिती, पाइपलाइनची कार्यक्षमता आणि प्रलंबित योजनांची पूर्तता यांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद, ग्रामपंचायती आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी समोर येण्यास मदत झाली असून, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.




Petrol Price




